बीड - शेंगदाणे समजून एरंडाच्या बिय्या खाल्याने ९ शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याची घटना हिवरगव्हाण (ता. वडवणी ) येथे घडली. या सर्व मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
रविवारी शाळेला सुटी असल्याने दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान हिरवगव्हाण येथील रोहन लक्ष्मण नखाते (१५), अभिषेक अनुरथ नाईकवाडे (११), अजय रतन नाईकवाडे (१५), जयराम जालिंदर गायकवाड (१४), चैतन्य ज्ञानोबा नाईकवाडे (१३), मकरध्वज हनुमान नाईकवाडे (१५), रावसाहेब अंगद शिनगारे (१५), धर्मराज हनुमान नाईकवाडे (१२) व शुभम हनुमान नाईकवाडे (१२) ही शाळकरी मुले गावाशेजारील मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. यावेळी काही मुलांनी शेंगदाणे समजून मोगला एरंडाच्या बिया खाल्या. त्यांचे अनुकरण करत सर्वच मुलांनी या बिया खाल्या. मात्र, काही वेळानंतर त्यांना उलटी, मळमळ असा त्रास सुरु झाला. अनाचक सुरु झालेल्या त्रासामुळे पालकही घाबरुन गेले. त्यानंतर मुलांनी आपण बिया खाल्याचे सांगितले. सुरुवातीला वडवणी आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.