बीड - मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजूर महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी आले होते. ते दलालांमुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अडकून पडले होते, याबाबत विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व माजलगाव पोलिसांना या मजुरांची सुटका करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या मजुरांची आता सुटका होत असून, मंगळवारी हे मजूर आपल्या घरी पोहोचणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
छिंदवाडा येथील मजूर पुरवणाऱ्या दलालाने, बीड जिल्ह्यातील मुकादमाकडून पैसे घेतले, व त्याबदल्यात 29 मजूर या मुकादमांना पुरवण्यात आले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तीन कारखान्यावर या मजुरांनी ऊसतोडणीचे काम केले. शेवटी हे मजूर सादोळा ता. माजलगाव येथे ऊसतोडणी साठी आले होते, त्यांना ऊसतोडणीचे पैसे देऊन गावी परत पाठवण्याचे ठरले होते, मात्र या मुकादमाने त्यांना घरी पाठवले नाही. त्यामुळे हे मजूर गेल्या तीन दिवसांपासून माजलगावमध्ये अडकून पडल होते.
मजूर व मुकादमाची संयुक्त बैठक
आज याबाबतचे वृत्त काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार समाज कल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी, बाल कल्याण समिती सदस्य तत्वशिल कांबळे, बाल संरक्षण समिती सदस्य अशोक तांगडे, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलिस अधिकारी पुंडगे, सत्यभामा सौंदरमल, राधाबाई सुरवसे यांनी मजूर व मुकादमाची संयुक्त बैठक घेऊन, दोघांचे म्हणने ऐकूण घेतले. त्यानंतर त्यांनी मजुरांचे मुकादमाकडे आडकलेले पैसे त्यांना मिळून दिले. व त्यांची त्यांच्या मुळगावी जाण्याची व्यवस्था केली.