बीड - जिल्ह्यात बुधवारी २ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. यामध्ये बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील शेतकऱ्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. दिलीप बाबुराव वाहुळ (54) तर दुसरा बाळासाहेब गायकवाड (40) असे आत्महत्या केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांची नावे आहेत.
दिलीप वाहुळ हे बुधवारी सकाळी घरून निघाल्यानंतर दुपारी गावातील मिटकरी यांच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. दिलीप वाहुळ यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील चाळीस वर्षे शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांनी जमीनीच्या अन्नापैकी नापिकीतून आलेल्या नैराश्यामधून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत बाळासाहेब गायकवाड मागील अनेक दिवसांपासून होते. बाळासाहेब गायकवाड यांच्या वडिलांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 60000 तर डीसीसी बँकेचे 70 हजार रुपये कर्ज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी तीन मुले असा परिवार आहे.
सातत्याने पडणारा दुष्काळ यामुळे कर्जबाजारीपण येत आहे. परिणामी कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होतो. यातूनच नैराश्य आल्याने शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे समोर येत आहे. हे आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहे.