औरंगाबाद - आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र आपली साथ कधी सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, आज सावलीने औरंगाबादकरांची साथ सोडली. स्वतःची सावली गायब झाल्याचा अनुभव आज औरंगाबादकरांना आला. बुधवारी झीरो शॅडो अर्थात शून्य सावली ही घटना आज साधारण दुपारी १२.२२ ते १२.२७ या वेळेत अनुभवयास मिळाली.
तौक्ते वादळामुळे होता ऊन सावलीचा खेळ
तौक्ते चक्रीवादळामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते त्यामुळे ऊनसावलीचा खेळ सुरू होता. मात्र दुपारी बारा वाजता आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली व नागरिकांना शून्य सावली अनुभवता आली.
यंदा सावली पाहण्याचा सध्याची संधी हुकली
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी एमजीएम विज्ञान केंद्रावर नागरिकांना येण्यास मनाई केली होती. मात्र शून्य सावली प्रयोगाची सर्व व्यवस्था केली होती. २१ जूननंतर दक्षिणायन सुरू झाल्यावर पुन्हा एकदा जुलै महिन्यात आपल्या डोक्यावर सूर्य येतो परंतु त्या वेळेस आपल्याकडे पावसाळा सुरु असल्याने ही घटना पाहता येत नाही, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. या प्रयोगाच्या वेळी केंद्र व्यवस्थापक अशोक क्षीरसागर व मयुर पवार उपस्थित होते. तर, शहरातील अनेक विज्ञानप्रेमींनी घराच्या गच्चीवरच जाऊन शून्य सावली अनुभवली.