कन्नड (औरंगाबाद) - नवीन घराजवळ अपूर्ण अवस्थेतील पाण्याने भरलेल्या हौदात रमेश बरबंडे युवकाचा पाय घसरून पडुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना कन्नड़ तालुक्यातील देवगाव रंगारी येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कन्नड़ तालुक्यातील देवगांव रंगारी येथील सुधाकर बरबंडे यांच्या नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घराचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले होते. दरम्यान दोन दिवसापासून थोडी कामास सुट मिळाल्याने त्यांनी स्थानिक बांधकाम मिस्तरीच्या साह्याने काम सुरू केले होते.
मंगळवारी दिवसभर काम चालू होते. संध्याकाळी काम बंद झाल्यावर सुधाकर बरबंडे याचा मुलगा रमेश बरबंडे (वय २८) याने रात्रीपर्यंत परिसर स्वच्छ केला. परंतु, उशीर झाला तरी मुलगा घरी जेवायला का आला नाही म्हणून आईवडिलांनी त्याची शोधा शोध केली शेवटी एखाद्या मित्राकडे गेला असेल म्हणून दोघीही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सहा वाजता नेहमी प्रमाणे सुधाकर बरबंडे नवीन बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेले. त्यावेळी हौदातून बादलीने पाणी काढत असतांना त्यांना मुलगा रमेशची एक चप्पल आढळुन आली. त्यांनी शंकेपोटी हौदात डोकावून पाहिले असता मुलगा पाण्यात पडलेला दिसून आला.
घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना दिली. पोलीस उपनिरिक्षक शैलेश जोगदंड सह बीट जमादार आप्पासाहेब काळे,दादाराव चेळेकर हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले.आजुबाजुच्या तरूणाच्या सहकार्याने रमेश यास बाहेर काढण्यात आले असता डोक्याला गंभीर मार लागल्याचे दिसुन आले त्यास ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यास वैद्यकीय अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी तपासुन मृत घोषित केले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तेथे डॉ .गंवाडे यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रमेश यांच्या पश्चात वडील,आई ,एक भाऊ ,एक बहिण,भावजय असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात दुपारी बारा वाजता दरम्यान येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.