औरंगाबाद - व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवर धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आमिर खान आलफ खान (वय ३५ वर्ष रा. मोतीकारंजा) असे व्हॉट्सअॅपवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाचे नाव आहे.़
आमिरचे एमएससी केमिस्ट्री शिक्षण पूर्ण झालेले आहे. सध्या तो लॅब टेक्निशियन म्हणून काम करीत आहे. त्याने कुठलीही शहानिशा न करता व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये मारहाण सारखे रंजक दृश्य होते. एका विशिष्ट समाजाने अत्याचार केल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते.
अशा खोट्या व्हिडिओमुळे तरुणांची माथी भडकली जाऊ शकतात. दोन समाजामध्ये ती पोस्ट शहरातील विविध ग्रुपवर व्हायरल होत होती. ही बाब लक्षात येताच गुन्हे शाखेच्या पथकाने आमीरला अटक करीत त्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेटिझन्सनी व विशेष करून तरुणांनी प्रत्येक पोस्ट व व्हिडिओची खात्री केल्यानंतरच इतर ग्रुपवर किंवा इतर सोशल माध्यमांवर पोस्ट करावी. धार्मिक तेढ निर्माण करणारी व कोणाला दुःख होईल, कोणाला हानी होईल अशी पोस्ट करणे टाळावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी केले आहे.