औरंगाबाद - जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांना केला आहे. तनुश्री तुपे असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया करताना डॉक्टर कापसाचा बोळा महिलेच्या पोटात विसरले, यामुळे महिलेला त्रास सुरू झाला. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात 22 जुलै रोजी तनुश्री या प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. 23 जुलैला तनुश्री यांचे सिजरींग करण्यात आले. तनुश्री यांनी एक गोंडस मुलाला जन्म दिला. नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यानंतर दोन दिवस त्यांनी बाळाला दूध देखील पाजले, मात्र त्यानंतर त्यांना असह्य वेदना सुरू झाल्या. म्हणून पुन्हा त्यांच्या आई-वडिलांना त्यांना गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात तिला नेले. डॉक्टरांनी तनुश्रीची तपासणी केली आणि पुढच्या उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवले. यावेळी उपचारादरम्यान 27 जुलैला तनुश्री यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दहा दिवसाचे बाळ आईच्या मायेला पोरके
तनुश्री यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरिराचे शवविच्छेदन करण्यात आले. जेव्हा रिपोर्ट वडिलांच्या हाती पडला तेव्हा त्यांना जबर धक्का बसला, कारण तनुश्री यांचा मृत्यू आजारामुळे नव्हे तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला होता. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर कापसाचा बोळा तनुश्रीच्या पोटातच विसरून गेले. त्यामुळेच त्यांना जीव गमवावा लागला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तनुश्री यांच्या नातेवाईकांनी आज गंगापूर पोलिस ठाण्यांमध्ये डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दोषी डॉक्टर रवींद्र ठवाळ यांना तात्काळ निलंबित केले आहे. डॉक्टरच्या या चुकीमुळे मात्र 10 दिवसाचे बाळ आणि त्याचा 2 वर्षांचा भाऊ आईच्या मायेला पोरके झाले आहेत.