औरंगाबाद - गळ्याला कोयता लावून वृध्देचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना बुधवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुशीला दगडू काळे (६२, रा. मनोरमा पार्कच्या मागे, मयूरनगर, एन-११, हडको) असे मंगळसूत्र हिसकवलेल्या महिलेचे नाव असून, दुचाकीवर आलेल्या माणसाने त्यांचे मंगळसूत्र हिसकवले.
सुशीला काळे या सकाळी घराच्या पाठीमागील जागेत दात घासत उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर एक जण त्यांच्या समोर दोन चकरा चोराने मारल्या. त्यानंतर तो अचानक काळे यांच्या समोर आला आणि त्याने काळे यांच्या गळ्याला कोयता लावून मंगळसूत्र हिसकावले. त्याला काळे यांनी प्रतिकार केल्यामुळे अर्धे मंगळसूत्र वाचले. मात्र, चार ते पाच ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्याच्या हाती लागले.
घटनेनंतर लगेचच काळे यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखा निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक योगेश धोंडे, पोलीस नाईक प्रकाश डोंगरे व इतरांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.