औरंगाबाद - शहरातील सलीम अली सरोवरमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. या महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष आहे. अद्याप या महिलेची ओळख पटली नसून सिटीचौक पोलीस या महिलेची ओळख पटविण्याचे काम करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेला पाण्याबाहेर काढल्यावर प्रथमोपचार केले. मात्र, काहीच फरक पडत नसल्याने पोलिसांनी या महिलेला तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली असता, तिला मृत घोषित केले. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या महिलेला कोणी ओळखत असेल तर त्यांनी सिटी चौक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.