औरंगाबाद - झाडाखालीच वृद्ध महिलेला ऑक्सिजन सिलिंडर लावल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूज परिसरात घडला आहे. जवळपास तासभर ही महिला स्वतःच्या हातात ऑक्सिजन पाईप धरून बसली होती. या प्रकारामुळे आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गंगापूर तालुक्यातील 67 वर्षीय महिला खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने सुनेसोबत वाळूज येथे उभारण्यात आलेल्या कोविड केंद्रावर आली होती. त्यावेळी तिच्यासोबत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या कोविड तपासणी केंद्रात अत्यावश्यक सेवेसाठी काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर एकही रुग्ण नसतानाही महिलेला झाडाखाली बसवण्यात आले असल्याने कोविड केंद्रावर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शनिवारी दुपारी ही महिला वाळूज येथील आरोग्य केंद्रात दाखल झाली. खोकला असल्याने तिची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर वृद्धेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला एका कक्षात नेऊन तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्या वृद्धेला बाहेरच एका झाडाखाली बसवले आणि तिथे ऑक्सिजन सिलेंडर लावून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे त्या महिला रुग्णाच्या हातातच ऑक्सीजन पाईप देण्यात आली. जवळपास तासभर ही महिला अशाच अवस्थेत झाडाखाली ऑक्सिजन मास्क लावून बसली होती. त्या वृद्धेला कोरोना झाल्याचे गृहीत धरून तिला अशी वागणूक दिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, रुग्णाला उपचार देत असताना योग्य काळजी आरोग्य विभागाने का घेतली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा - नारायण राणे आणि राम कदमांच्या 'त्या' वक्तव्यांना कृषिमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले..
या कोविड केंद्रावर फक्त आरोग्य तपासणी केली जाते. रुग्णांना दाखल करून घेण्याची कुठलीही व्यवस्था अद्याप येथे नाही, असा दावा स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. एका तासाने या महिलेला रुग्णावाहिकेतून घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य रामदास बोरकर यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वाळुंजमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा - मासे पकडणे बेतले जीवावर..! सख्ख्ये भाऊ नदी पात्रात बुडाले, एकाचा मृत्यू