औरंगाबाद - कॅमेरा उत्पादनातील अग्रगण्य असलेल्या निकॉन कंपनीचा ब्रँड अँबेसिडर होण्याचा मान औरंगाबादच्या बैजू पाटील यांना मिळाला आहे. वन्य जीव छायाचित्रकार म्हणून अशा सन्मान मिळवणारे बैजू पाटील देशातील पहिलेच छायाचित्रकार ठरले आहेत. हा सन्मान मिळाल्यानंतर मागील ३० वर्षांमध्ये केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना पाटील यांनी व्यक्त केली.
कॅमेरा निर्मितीत निकॉन ही कंपनी जगातील अग्रगण्य मानली जाते. या कंपनीने तयार केलेल्या नवनवीन कॅमेऱ्यांचे ब्रँडिंग बैजू पाटील यांना करायला मिळणार आहे. छायाचित्रकार म्हणून बैजू पाटील यांच्या कार्याची जागतिक स्तरावर अनेकदा दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन बैजू पाटील यांच्या माध्यमातून कॅमेरा हाताळणाऱ्या किंवा कॅमेऱ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या ज्ञानाचा आणि कलेचा फायदा होईल, यासाठी पुढील तीन वर्षांसाठी बैजू पाटील यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
बैजू पाटील म्हणाले, जुन्या काळात निगेटिव्हीद्वारे काढण्यात येणारे छायाचित्र ते आताच्या मिरर लेस प्रणाली पर्यंतचे जवळपास सर्वच कॅमेरे वापरण्याची मला संधी मिळाली. माझ्या कामाचे कौतुक झाले. याच कामाच्या माध्यमातून अनेकांनी प्रेरणा घेतली. मागील तीस वर्षांमध्ये माझ्या कामात नाविन्य असल्याने मला ही संधी मिळाली.
लग्न, मॉडेलिंग, वन्यजीव असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये वन्यजीव छायाचित्र या प्रकारात मला ही संधी देण्यात आली आहे. या संधीमुळे मला आता वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन काम करायला मिळेल. तिथे कॅमेराबद्दल मार्गदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक भागात छायाचित्र घेताना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. त्यात आता नव्या कॅमेऱ्यामध्ये काय बदल हवा, याबाबत मला तांत्रिक सल्लाही द्यावा लागणार आहे. हे माझ्या आवडीचे असून मला याचा खूप आनंद झाल्याचे, पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा - मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा
हेही वाचा - औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला स्थगिती, समन्वयकांना कोरोनाची लागण