कन्नड (औरंगाबाद) - पंचायत समिती कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांच्या मार्गदर्शना खाली रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्धघाटन सेवा निवृत्त प्राध्यापक रंगनाथ लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. चव्हाण, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पंचायत समिती उपसभापती डॉ. नयना तायडे, काकासाहेब तायडे, माजी उपसभापती रुबिना,बी डॉ. सिकंदर कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पावसाळा सुरू झाला की, रानावनात शेकडो प्रकारच्या रानभाज्या उगवतात कटोंली, अळंबी, आघाडा, अमरकंद, आचकंद, कोवळे बांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, कुसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा, कुरडू, गुळवेल, अंबाडी, कासली, फांग, अरवी, तांदुळकुंद्रा, चवळीच्या डेऱ्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वागोटी, हळंदा, अळूची पाने, समिंद शोकची पाने, करटोली, आंबुशी, कूर्डु, डेना, अंबाडी, सुरण, दिडा, कुडा, टाकळा, पाथरी, अशा अनेक भाज्या या ठिकाणी होत्या.
आजच्या पिढीला या रानभाज्याची ओळखही नाही व त्यापासून भाजी कशी बनवायची हे ही माहित नाही. अशा अनेक प्रकारच्या भाज्या या महोत्सवात होत्या. या रानभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या भाज्या कुठल्याही रासायनिक खत अथवा किटकनाशकांचा वापर न केलेल्या असतात. त्याचबरोबर या चविष्ट व आरोग्यदायी असतात. या भाज्यामध्ये ऋतूमानाप्रमाणे आहारात बदलपणा करता येतो.
रानभाज्यांची नवीन पीढीला माहिती व्हावी, रानभाज्यांच्या विक्रीस चालना मिळावी व ग्रामीण लोकांना आर्थीक उत्पन्नचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे प्रास्ताविक तालुकाकृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी व्यक्त केली. यावेळी प्रगतशील शेतकरी अजय जाधव, सुदाम बोडखे सह अन्य शेतकऱ्यांनी आपल्या स्टॉलद्वारे रानभाज्याचे प्रदर्शन केले.