औरंगाबाद - घरासमोर माती टाकल्याच्या कारणावरुन वेल्डरला वाद घालत मारहाण व शिविगाळ करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे चौघांच्या त्रासाला कंटाळून वेल्डरने २२ ऑगस्टला सकाळी नऊच्या सुमारास मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ मालगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. या वेल्डरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील महिलेसह चौघांविरुध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडीतील स्वराजनगरात राहणारे वेल्डर शिवाजी अण्णा खांडेभराड (५१) यांचे शेजारी राहणाऱ्या सुरेखा धोंडगे यांच्याशी घरासमोर माती टाकण्यावरुन १९ आॅगस्ट रोजी भांडण झाले होते. त्यावेळी सुरेखा धोंडगे हिच्यासह तिच्या दोन मुलींपैकी पोलीसस मुख्यालयात कार्यरत असलेल्या छाया आणि कंडक्टर मुलगी तसेच मुलगा परमेश्वर धोंडगे यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर चौघांनी खांडेभराड हे २१ ऑगस्टला सकाळी ८ च्या सुमारास घराबाहेर उभे असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच त्यांना खोट्या गुन्ह््यात अडकविण्याची धमकी दिली. त्यावरुन खांडेभराड यांनी २२ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास पोलीस ठाण्यात जातो, असे सांगत थेट मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पंचनाम्यादरम्यान पोलिसांन खांडेभराड यांच्या पँटच्या खिशात आधारकार्ड, रुग्णालयाची पावती आणि सुसाईड नोट आढळून आली. परमेश्वर धोंडगे, सुरेखा धोंडगे, छाया व कंडक्टर महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी महिला पोलीस छाया, तिची कंडक्टर बहीण, भाऊ परमेश्वर आणि त्यांची आई सुरेखा यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादाराव कोपनर करत आहेत.