औरंगाबाद - कोरोनामुळे मृत्यूचा तांडव पाहायला मिळत आहे. रोज वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही चिंतेची बाब झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल महिण्यात 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्मशान भूमीत आता मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचं धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे.
रोज होत आहेत 25 पेक्षा जास्त मृत्यू-
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात पसरत असल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचे प्रमाण देखील वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून रोज 25 ते 30 बधितांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीत काही वेळा अंत्यविधी करायला जागा कमी पडत असून मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कर करण्याची वेळ ओढवत आहे.
अंत्यविधीसाठी पुढे सरसावल्या सामाजिक संस्था-
कोरोना बधितांचा मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर येणारा ताण वाढला आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. शहरातील पंचशील महिला बचत गट आणि मस्तान सेवाभावी सारख्या संस्था पुढे आल्या आहेत. रोज पंचवीस ते तीस मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. स्वतःची काळजी घेत या संस्था अंत्यसंस्कार करत आहेत. परिस्थिती बिकट होत चालल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासन करत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पहावी लागत आहे वाट-
कोरोना बधितांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. उपचार घेत असताना रुग्ण दगावत आहेत. दिवसभरात रुग्ण दगावण्याच्या घटना वाढल्या आहेत. मृत्यूनंतर कायदेशीर आणि वैद्यकिय प्रक्रिया पूर्ण होण्यास अवधी लागत असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी देखील बराचवेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
हेही वाचा- कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द