औरंगाबाद - सिल्लोड नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. सिल्लोड नगरपालिकेत २६ नगरसेवक पदांसाठी १०४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी ५७ मतदार केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १ हजार २६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार केंद्रावर ४४ हजार ९७३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यामध्ये २४ हजार ३६१ पुरुष तर २० हजार ६२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५७ मतदान केंद्रात २५ मतदार केंद्र संवेदनशील मतदार केंद्र आहेत. सर्व मतदार केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर ५ कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी, १ पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी, असे पोलीस सुरक्षा बळ असणार आहे. शिवाय ५ पोलीस पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे. प्रशासनाच्यावतीने ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षक, यांच्यासह ९०० पोलीस कर्मचारी, असा पोलीस कर्मचारी बंदोबस्त असणार आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. थेट निवडणुकीतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.
- हे उमेदवार आजमवणार नशीब -
- अशोक तायडे - भाजप
- राजश्री निकम - काँग्रेस
- विनोद पगारे - राष्ट्रवादी
- प्रभाकर पारधे - एमआयएम
- राजू रोजेकर - बहुजन समाज पार्टी
- आनंद शेळके - आम आदमी पार्टी
- अनिल साबळे - अपक्ष
- अशोक सोनवणे - अपक्ष
- साहेबराव सोनवणे - अपक्ष