औरंगाबाद - सकाळपासून वोडाफोन कंपनीचे नेटवर्क नसल्यामुळे बहुतांश ग्राहकांचा रोष मोंढा नाका येथील वोडाफोन कार्यालयात बघायला मिळाला. नेटवर्क नसल्यामुळे काही ग्राहकांच्या व्यवसायावर परिणाम झाला, तर काहींच्या नोकरीवर नकारार्थी प्रभाव झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या विषयी वोडाफोन कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
वोडाफोन कंपनीचे नेटवर्क सकाळपासून नसल्याने अनेक नागरिकांनी थेट मोंढा नाकास्थित वोडाफोन कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला, परंतु नागरिकांचा रोष बघता अधिकाऱ्यांनी ते कार्यालय बंद केले. परंतु, ग्राहक वोडाफोन कार्यालयावर येतच होते.
हेही वाचा - पुण्यात वोडाफोन नेटवर्क ठप्प, ग्राहक वैतागले
लेबर कंत्राटदार असलेल्या एका ग्राहकाने तर सकाळपासून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलणे झाले नसल्यामुळे कामाचा आढावा घेणे मुश्कील होऊन पैशांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे सांगितले. तर नोकरीच्या मुलाखतीसाठी बारा वाजता खासगी कंपनीमधून फोन येणार होता, परंतु नेटवर्क गेल्यामुळे नोकरीला मुकावे लागणार असल्याची भावना एकाने व्यक्त केली. आजारी बहीण बाहेर गावावरून तपासणीसाठी शहरात येणार होती, परंतु माझे कॉल लागत नसल्याने चिंता वाढल्याचे उपस्थित ग्राहकाने सांगितले.
याबद्दल 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. हे सर्व पुण्याच्या कार्यालयातून होत असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नसल्याचे सांगितले. मात्र, या सर्व बाबींचा मनस्ताप नागरिकांसह ग्राहकांना सोसावा लागत असल्याचे चित्र होते.