औरंगाबाद - शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार केले आहे. सर्वसाधारणपणे आठ लाखांपेक्षा जास्त किंमतीत मिळणारे व्हेंटिलेटर आता तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहे. पूर्णतः मेड इन इंडिया असणारे हे यंत्र मोबाईलवर देखील नियंत्रित करता येणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने रुग्णालयात लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने हे व्हेंटिलेटर विकसित केले आहे. हे व्हेंटिलेटर मल्टीस्क्रीन म्हणजेच एका वेळी रुग्णालयासह डॉक्टरांच्या मोबाईलमधून देखील नियंत्रित करता येऊ शकेल. यामुळे गंभीर असलेल्या रुग्णाला तातडीचे उपचार देणे शक्य होणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. योगेश साठे यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अश्फाक सिद्दीकी यांनी हे व्हेंटिलेटर विकसित करण्यास मोठा वाटा उचलला. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात व्हेंटिलेटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागू शकते. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून हे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना अनेकवेळा आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्ण असलेल्या वार्डात वारंवार जाणे जोखमीचे वाटते. त्यामुळे या व्हेंटिलेटरला मल्टिस्क्रीन पर्याय देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरवर दर्शनीय बाजूला एक स्क्रिन असणार आहे. मात्र, त्याचबरोबर ते मोबाईलवर देखील नियंत्रित करता येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज भासल्यास रुग्णांसाठी उपचारात तातडीचे बदल करणे शक्य होणार आहे.
बाजारात विदेशी बनावटीचे व्हेंटिलेटर आठ लाखांच्या घरात जाते. मात्र, पूर्णतः देशी बनावटीचे व्हेंटिलेटर असून तीन लाखाहून कमी किंमतीत हे विकसित करण्यात आले आहे. रुग्णांना कृत्रिम श्वास देणे हा एकच उद्देश नसतो, रुग्णाला आवश्यक असेल तितकाच कृत्रिम श्वास देणे अपेक्षित असते. तो देत असताना रुग्णांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही, याची काळजी देखील घेतली गेली पाहिजे. अशा पद्धतीने हे व्हेंटिलेटर विकसित केले असून मल्टिस्क्रीनमुळे काही क्षणात योग्य उपचार ही जमेची बाजू असल्याचे घाटी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. पंकज वैरागड यांनी सांगितले.
केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपलब्ध साधन सामग्री वापरून व्हेंटिलेटर विकसित केले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली असून लवकरच पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाची मान्यता मिळेल, असा विश्वास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. डॉ. प्राणेश मुरमाळ यांनी दिली आहे.