सिल्लोड (औरंगाबाद) - आज जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जात आहे. असे म्हणतात कि, आजच्या दिवशी अनेक जण आपल्या आवडत्या तिला किंवा त्याला मागणी घालतात. एकमेकांशी प्रेमाची बंधने बांधतात. अनेक जण प्रेमात पडतात, मात्र सर्वच जण यशस्वी होतात असे नाही. आता सिल्लोड येथील शैलेश शिंदे आणि श्रद्धा शिंदे यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाला साजेशी असल्याचे दिसून येते.
सहा वर्षांपूर्वी पुण्याच्या पिंपरी-चिंचवड या उपनगरात राहणारा शैलेश शिंदे, हा नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमास गेला असता त्याची आणि श्रद्धाची पहिली भेट झाली. यानंतर त्यांची वेगवेगळ्या कारणांवरून भेट होत राहायची. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे त्यांना कळले सुद्धा नाही. दरम्यान, श्रद्धाचे आई-वडील तिच्यासाठी लग्नासाठी स्थळे शोधत होती. मात्र, श्रद्धाने शैलेशला आपला जीवनसाथी म्हणून निवडले होते. शैलेशनेही हिम्मत करत श्रद्धाच्या आई-वडिलांना भेटून तिच्याशी लग्नाची मागणी घातली. मात्र, त्यांनी ही मागणी नाकारत श्रद्धाला घराच्या बाहेर पडायलाही बंदी घातली.
हातगाडीवर वडापाव विकायचा निर्णय
काही दिवसानंतर या दोघांनी निवडक नातेवाईकांच्या साक्षीने लग्न उरकून कायमचे घर सोडायचा निर्णय घेतला आणि सिल्लोडसारख्या ग्रामीण भागात राहायला आले. नवीन जोडप्याला अशा परीस्थितीत हाताला काम कोण देणार? याचा विचार सुरू असताना जीवन जगायचे म्हटले तर काम करावे लागेल, म्हणून दोघांनी सिल्लोड शहरात एका हातगाडीवर वडापाव विकायचा निर्णय घेतला. येथून पुढे दोघांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.
आज तीन शाखा सुरू झाल्या..
कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटले, तर त्याला भांडवल हे लागणारच होते. त्यासाठी शैलेशच्या मित्रांनी काही रक्कम दिली. तसेच श्रद्धाचे काही दागिने विकून एक हातगाडी घेत त्यावर वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वेळोवेळी धंदा करताना विविध अडचणी येत होत्या, त्यावर मात करीत हे दोघे आपला संसार सुखाने करीत होते. एका हातगाडीवरून सुरू झालेल्या व्यवसायाचे आजमितीला मोठ्या वटवृक्षात रूपांतर होऊन 'पुणेरी वडापाव'च्या आज तीन शाखा सुरू झाल्या आहेत. घर सोडलेल्या प्रेमी युगलाचे बाहेर हाल झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र, शैलेश व श्रद्धा याला अपवाद ठरले आहेत आणि त्यांनी प्रेमविवाह यशस्वी करण्याची अनेकांना साद घातली.