औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur MLA) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदाराकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे (Shivsena MLA Ramesh Bornare) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचली आहे.
- भाजपच्या कार्यक्रमात गेल्यामुळे मारहाण; महिलेचा आरोप
पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, काल आमच्या गावात भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. दरम्यान आज आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला आलो असता,आमदार रमेश बोरणारे यांनी मला भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच रस्त्यावर खाली पाडून लाथानी मला मारले असल्याचे महिलेने म्हटले आहे. तसेच यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीलासुद्धा मारहाण केली असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
- गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया -
तसेच आमदार यांच्यासह त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनीसुद्धा मारहाण केली असल्याचे महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महिला वैजापूर पोलीस ठाण्यात पोहोचली असून, तक्रार दाखल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.