औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, धारला व हट्टी परिसरात झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह गारांचा पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे परिसरातील कांदा, गहू, हरभरा, सूर्यफूल, ज्वारी आदी पिकांना फटका बसला.
अनेक ठिकाणी मक्याची कणसे शेतामध्येच पडून आहेत. तसेच, कांदा पीक थोड्या प्रमाणात तग धरून असतानाच, गारांनी हजेरी लावल्याने हाताशी आलेले पीक गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी..
दरम्यान गारपिटीने नुकसान झालेल्या काही भागात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतातील बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तालुक्यासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस व गारपीट मुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असून, नेमकी किती नुकसान झाले हे समोर आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल असे सत्तार यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, अरुण पा. शिंदे, रफिक देशमख, कौतिकराव मोरे, सरपंच तुकाराम ढोके आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.