औरंगाबाद - अजिंठा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घुसून एका अज्ञात व्यक्तीने मुलींना मारहाण केल्याची घटना घडली. दुसरी आणि तिसरीच्या वर्गात शिक्षक नसल्याचे पाहून ही व्यक्ती तोंडाला काळा रुमाल बांधून शाळेत घुसली. त्यानंतर वर्गाला आतून कडी लावून वर्गातील चिमुकल्या मुलींना त्याने रजिस्टर आणि छडीने बेदम मारहाण केली.
'पढाई अच्छे से करो, मैं कल फिर आऊँगा और तुमको उठाके ले जाऊँगा', असे हिंदी भाषेत बोलून तो निघून गेला. त्यानंतर रडत बाहेर आलेल्या मुलींनी झालेला प्रकार सांगितल्याने, ही घटना उघडकीस आली. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत आहेत.
झालेल्या प्रकाराबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक जे.जे. शेख यांनी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ती अज्ञात व्यक्ती कोण होती? वर्गात कशी घुसली? मुलींना का मारहाण केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.