छत्रपती संभाजीनगर : वैजापूर व गंगापूर तालुक्यातील एकूण 365 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. ही पाणी टंचाई दूर करण्यास वरदान ठरणाऱ्या शासनाच्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 30 जूनला करण्यात येणार आहे. हा शुभारंभ गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी आयोजित या पत्रकार परिषदे डॉ भागवत कराड हे बोलत होते. यावेळी डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, दिनेश राजपूत, प्रशांत कंगले, मोहन आहेर, प्रभाकर गुंजाळ आदींची यावेळी उपस्थिती होती.
जायकवाडीचे पाणी गंगापूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात : भाजपने 30 मे ते 30 जून या कालावधीत राबविलेल्या नऊ कार्यक्रमांची माहिती डॉ भागवत कराड यांनी दिली. वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 365 गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मिशनतर्गंत मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत एक हजार 75 कोटी 62 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील जनतेला नळाचे पाणी पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी गंगापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर वैजापूर तालुक्यातील 131 किलोमीटर व गंगापूर तालुक्यातील 182 किलोमीटर लांबीची पाईपलाईंन टाकून दोन्हीही तालुक्यातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैजापूर तालुक्यात बांधण्यात येणार 157 जलकुंभ : मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यात 157 जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी सुमारे 105 एमएलडी पाण्यची क्षमता असलेली जलशुध्दीकरण यंत्रणा कायगाव येथे कार्यान्वित केली जाणार असल्याचेही डॉ भागवत कराड यांनी सांगितले. या कामाचे औपचारिक भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 30 जून रोजी सकाळी 11 वाजता गंगापूर येथे येणार आहेत. भूमिपूजनानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ भागवत कराड यांनी यावेळी केले आहे.
वैजापूर तालुक्यात पुन्हा उलटी 'गंगा' : मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्धा - अर्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी एक हजार 75 कोटी 62 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी दरडोई दररोज 55 लिटर पाणी मिळेल. तसेच सन 2055 पर्यंत म्हणजेच पुढील 30 वर्षांपर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. वैजापूर व गंगापूर हे दोन्हीही तालुके अवर्षणप्रवण म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प दोन्हीही तालुक्यांसाठी नक्कीच वरदान ठरून 'तृष्णा' शमविणार आहे. यापूर्वीही रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून गोदेतून वैजापूर तालुक्यात उलटी गंगा आणण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो प्रयत्न नियोजनाअभावी फसला गेला. आता पुन्हा एकदा उलटी गंगा तालुक्यात आणून तहानलेल्या लाखो नागरिकांना यातून नक्कीच दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा -