औरंगाबाद - राज्यातून भाजप-शिवसेनेला घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं शरद पवार सांगत आहेत. तसचं होणार! कारण आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. शरद पवार यांचा सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव सर्वांनी पाहिला आहे. वसंतदादा, अटलबिहारी वाजपेयी यांची सरकार पाडून तुम्ही ते दाखवून दिले. तुम्ही किती विघ्नसंतोषी आहात हे राज्यातील जनतेला माहित आहे, मात्र, आमचे सरकार तुम्ही पाडू शकणार नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टिकेला उत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीत तुमच्याकडून चूक झाली म्हणून आम्हाला गाडण्याची भाषा करणाऱ्यांच्या ७ हजार पिढ्या उतरल्या तरी भगवा खाली उतरवू शकणार नाहीत. आता पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका, गाफील राहू नका. असे म्हणत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत ठाकरे यांनी आपले मौन सोडले. इतकच नाही तर, रझाकार दहशत माजवू पाहत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असे म्हणत एमआयएम पक्षाला दहशदवादी असल्याचे उद्धव यांनी सांगितले. औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या जाहीरसभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - शिर्डी संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला औरंगाबाद खंडपीठाचा दणका
लोकसभा निवडणुकीत केलेली चूक पुन्हा करू नका, चुकलो तर कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण, शिक्षा म्हणून जर तुम्ही शिवसेनेला मतदान केले नसेल तर त्याचा फरक आम्हाला तर पडतोच, पण तुमच्या येणाऱ्या पिढीला देखील तो पडेल. अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत करत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली. कन्नडच्या त्या विश्वासघात्याने हिरव्याची साथ दिली, त्याला मी कदापी माफ करणार नाही. ५ वर्षात त्याच्या चुका पोटात घातल्या, पण भगव्याशी हरामखोरी खपवून घेणार नाही असे म्हणत ठाकरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा समाचार घेतला.
हेही वाचा - 'अनेकांच्या नामांकन अर्जात चुका, मात्र माझाच अर्ज जाणीवपूर्वक बाद केला'
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या विधानावर अजित पवार यांनी "५ वर्ष काय केले' या टिकेला देखील ठाकरे यांनी ५ वर्ष आम्ही तुमचे चाळे पाहत होतो अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. रडतात, भेटतात, गायब होतात ? काय नाटकं चालू आहे? असा चिमटादेखील त्यांनी यावेळी काढला. आधीच्या काँग्रेस नेत्यांकडे पाहून मान आदराने खाली झुकायची, पण आजचे नेते पाहून शरमेने मान खाली जाते. त्यामुळे, मी काँग्रेसवर फार बोलणार नाही असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.
हेही वाचा - पाय घसरून विहिरीत बुडाल्याने विद्यर्थिनीचा मृत्यू, औरंगाबादमधील घटना