औरंगाबाद- जळगाव येथे माझी गाडी अडवत हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादेत दिली.
राज्यात एबीव्हीपीच्या विरोधामुळे मला मोठे झाल्यासारखे वाटत आहे. कुठेही गेले की असलेली सुरक्षा पाहून केंद्रातून एखादा मंत्री आल्यासारखे वाटते. खरे तर त्यांचे आभार मानायला हवेत. हा असा विरोध करायला विनोद तावडे किंवा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगणार नाही, असा विश्वास असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर, काल देवेंद्र फडणवीस यांनी मिशन १५० घेतले नाही. घेतले असते तर फायदा झाला असता, असे सांगत त्यांना सत्तेत येता आले नाही याची खंत त्यांनी बोलून दखवली, अशी टीका उदय सामंत यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परिक्षांबाबतचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत औरंगाबादेत आले होते. विद्यापीठ अंतर्गत १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी पदवी परीक्षा देणार आहेत. त्यातील ९० टक्के विद्यार्थी ऑनलाइन, तर १० टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घराजवळ व्यवस्था केली जाईल. त्यावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्यांदाच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्याच्या आत घेतली जाईल आणि त्यांना पदवी दिली जाईल. कोविडमध्ये दिलेल्या पदवीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, या पदवीचा आदर सर्वांनी केला पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडी सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
पैठण येथील संतपीठ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल. स्वायत्त संस्था म्हणून महाराष्ट्र सरकार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या मध्यातून ही संस्था काम करेल. त्यासाठी सुरुवातीला २२ कोटींचा खर्च येईल. सुरुवातीला विद्यापीठाने हा खर्च करायचा आहे. आणि नंतर सरकार हा खर्च परत देईल. संतपीठाची जागा विद्यपीठाच्या नावावर केली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोना काळात शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती देखील सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- पडेगाव पॉवरहाऊसजवळ तरुणाची भोसकून हत्या; विवस्त्र अवस्थेत मिळाला मृतदेह