गंगापूर(औरंगाबाद) दरोड्याचा तयारीत असलेल्या 2 दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले आहे, तर चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लासुर स्टेशन येथे साई शंकर पेट्रोल पंप परिसरात काही व्यक्ती संशयितरित्या अंधारात लपले असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना पाहाताच दरोडेखोर त्यांच्याकडे असलेल्या स्कॉर्पियोमधून पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत यातील दोन दरोडेखोरांना पकडले, तर चार जण फरार झाले आहेत.
वाहनात आढळली हत्यारे
दरम्यान ज्या गाडीतून दरोडेखोर पळून जात होते, त्या गाडीची झडती घेतली असता, पोलिसांना वाहनात लोखंडी रॉड, गज, लाकडी काठ्या, तलवार अशी हत्यारे आढळून आली आहेत. दरम्यान पोलिसांनी हत्यारांसह गाडी जप्त केली आहे. प्रमोद शिरसाट, जितू गायकवाड दोघे राहणार डोमेगाव, ताराचंद भोसले, रवी भोसले, शक्तुर भोसले, सोनू सर्व राहणार गाजगाव ता. गंगापूर अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात शिल्लेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.