औरंगाबाद - बनावट रहिवाशी व उत्पन्न प्रमाणपत्र तयार करुन देणाऱ्या मल्टिसर्व्हिेसेस चालकाला जिन्सी पोलिसांनीअटक केली. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास किराडपुरा परिसरातील जनता मल्टीसर्व्हिसेसमध्ये छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली.
यामध्ये इरफान खान मज्जीत खान, व सैफ खान इरफान खान, ( दोघेही रा. किराडपुरा )असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. किराडपुरा परिसरात जनता मल्टीसर्व्हिसेसमध्ये बनावट रहिवाशी प्रमाणपत्र तयार करुन दिले जात असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्यासह सहायक उपनिरीक्षक रफी शेख, शेख हारुण, संजय गावंडे, राठोड, गणेश नागरे, सुनिल जाधव यांनी धाड टाकली असता तेथे अनेक रहिवाशी व इतर सरकारी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी त्याची पडताळणी केली असता सर्वच प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. दुकानातील प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स मशिन, बनावट स्टॅम्प व बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत.