औरंगाबाद : जालना-औरंगाबाद रस्त्यावर 3 जणांना कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. दुपारच्या सुमारास जालना रस्त्यावर धूत रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून कारचालक फरार झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70), आशामती विष्णू गायकवाड (वय 42) असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर आहिल्याबाई दादाराव गायकवाड, असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या तिन्ही महिला आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी औरंगाबादला आल्या होत्या.
या तिन्ही महिला धुत रूग्णालय चौकात रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. त्यावेळी चिखलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचालकाने तिघींना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तुळसाबाई गायकवाड व आशामती गायकवाड या दोघी जागीच ठार झाल्या. तर आहिल्याबाई गायकवाड या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर कारचालक भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.