औरंगाबाद - पैठण तालुक्यात बुधवारी दमदार पाऊस झाला. या पावसाने पैठणखेडा परिसरातील चितेगाव येथील कोल्हिची नदीला पूर आला. पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीच्या अंधारात बचाव कार्यासाठी अडचण येत असल्याने रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी परत शोधमोहिम सुरू करण्यात आली. यात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे.
पैठण तालुक्यातील पैठण खेडा येथे बुधवार संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पावसाने इधाटे पूल पाण्याखाली गेला. दरम्यान, बाहेरगावी गेलेली एक मुलगी गावाकडे परत आली. ती पुलाच्या पलिकडे अडकली. तिला आणण्यासाठी तिचा भाऊ अशोक परसराम हुले (वय 18) निघाला होता. दरम्यान, पूलावर त्याचा तोल पाण्यात गेला. यावेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेला त्याचा मित्र पुंजाराम कैलास नवले (वय 19) याने अशोकला वाचण्याच्या प्रयत्नात पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.
घटनेबद्दल गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी प्राथमिक शोधकार्य चालू करत घटनेची माहिती बिडकीन पोलीस ठाण्यात कळवली. मात्र, पोलीस आणि नागरिकांना सुरुवातीच्या शोधकार्यात यश आले नाही. रात्र झाल्याने नाईलाजाने हे शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बचाव दलाच्या सहाय्याने आज सकाळी साडेआठच्या सुमारास दोघांपैकी पुंजाराम नवले याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे.