औरंगाबाद - शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना गंगापूर तालुक्यातील पाचपिरवाडी शिवारात सोमवारी दुपारी घडली. स्वप्नील संतोष काळे (१५) व रविंद्र संतोष काळे अशी त्या शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत.
ठिबक सिंचनाच्या नळीने केला घात - गंगापूर तालुक्यातील पाचपिरवाडी शिवारात संदिप श्रीकांत लागू यांची शेती आहे. शेतीच्या कामासाठी टाकळीवाडी येथील विशाल नरोडे हे शेतगडी म्हणून काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी विशाल यांच्याकडे औरंगाबादेतील त्यांचे मावसभाऊ स्वप्नील संतोष काळे व रविंद्र संतोष काळे हे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आले होते. सोमवारी दुपारी दोन ते तीन मुलांसोबत ते शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. शेततळ्यात उतरण्यासाठी या मुलांनी ठिबक सिंचनाची नळी बांधून ते पोहण्यासाठी गेले होते. मात्र पोहण्यासाठी तळ्यात सोडलेली ठिबक सिंचनाची नळी तुटली आणि दोघे सख्खे भाऊ एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडाले. त्यांच्याबरोबर असलेल्या मुलांनी आरडाओरडा केला असता, त्यांचा मावसभाऊ विशाल नरोडे यांनी तातडीने लोकांना माहिती देऊन या दोघांना पाण्याच्या बाहेर काढले होते.
वाहन न मिळाल्याने पोलिसांनी दाखल केले रुग्णालयात - पाचपिरवाडी शिवारात दोन भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली. मात्र या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी वाहन उपलब्ध झालेल नाही. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्यातील जवान संतोष पवार, अर्जुन तायडे, अक्रम पटेल, गृहरक्षक दलाचे बाबा शेख घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांच्या वाहनात या भावांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब चाटे यांनी तपासून मृत घोषित केले.
सख्ख्या भावाच्या मृत्यूने परिसरात हळहळ - शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पवार, अर्जुन तायडे हे करत आहेत.