वैजापूर (औरंगाबाद) - दुचाकीवरून औरंगाबादकडे येत असलेल्या पती-पत्नीला समोरून आलेल्या भरधाव ट्रॅकने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार दाम्पत्याचा चेंदामेंदा झाला. पत्नीच्या मृतदेहाचे अवशेष उचलण्यासाठी पोलिसांना चक्क फावड्याचा वापर करावा लागला. ही घटना आज सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संजय पूनमचंद छानवाल (वय-51), मीनाबाई संजय छानवाल (वय-46 दोघे रा. शांतीनगर, परसोडा, लासूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, संजय हे पत्नीसह मोटारसायकलवरून (एम.एच.20 डी.एक्स.3179) औरंगाबाद शहरात येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. अपघातात दोघे ठार झाल्याचे पाहून ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेची माहिती स्थनिकांनी पोलिसांना देताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. अपघात एवढा भीषण होता की, पती व पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते. त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते. पोलिसांना अक्षरशः मृतदेहाचा खच खोऱ्याने उचलावा लागला. तर संजय यांचे शीर पोलिसांना आढळून आले नाही.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविले असून या प्रकरणी दुपारपर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक आडे यांनी दिली आहे.