औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून बुधवारी सकाळी 24 नवे रुग्ण आढळून आले. तर, दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एक गारखेडा येथील 58 वर्षीय महिला आहे. तर, बीड रोडवरील 94 वर्षीय महिला आहे. आता रुग्णसंख्या 677 झाली आहे तर, मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
हुसैन कॉलनी, गारखेडा येथील 58 वर्षीय महिलेला सकाळी सव्वादहा वाजता कोविड संशयित रुग्ण म्हणून
अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत भरती केले होते. त्यांना ताप, खोकला, दम लागणे, इ. लक्षणे आढळून आली होती. सोबतच त्यांना मधुमेह व हायपोथपॅराडिझम हा आजार होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात स्वॉब घेण्यात आला. त्यांचा अहवाल कोविड-19 पॉझिटिव्ह म्हणून प्राप्त झाला.
याशिवाय, अरुणोदय कॉलनी - बीड बायपास येथील 94 वर्षीय महिलेला 12 मे रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर अवस्थेत भरती केले होते. त्यांना भूक न लागणे, अशक्तपणा अशी लक्षणे होती. त्यांना घाटीमध्ये आणले होते तेव्हा त्या बेशुध्दावस्थेत होत्या. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचाही मृत्यूपश्चात स्वॉब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या मृत्युचे कारण 'बायलॅटरल न्युमोनायटिस वुईथ रेस्पिरेटरी फेल्युअर विथ कोविड-19' असे होते.