औरंगाबाद - बनावट जामीनपत्र तयार करून पलायन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन कैद्यांचा पर्दाफाश झाला आहे. औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून 'मोक्का' च्या कारवाईमध्ये अटक असलेल्या तीन आरोपींनी संगणमत करून न्यायालयाचे बोगस जामीनपत्र तयार केले होते. हर्सूल कारागृह अधिकाऱ्यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने आरोपीचा बनाव उघडकीस आला आहे.
न्यायालयात कैद्यांना नेत असताना उघड झाला प्रकार
कैद्यांना न्यायालयात हजर करत असताना त्यांची झडती घेतली जाते. अशीच झडती घेत असताना विशाल पारधे या कैद्याच्या कमरेला एक बंद लिफाफा आढळून आला. हा लिफाफा उघडून पाहिला असता, त्यामध्ये उद्धव भोसले आणि आसाब दस्तगीर शेख यांचे बनावट जामीन पत्र आढळून आले. याबाबत मिलिंद पारधे याच्याकडे चौकशी केली असता, आसाब शेख याने हे बनावट जामीन पत्र कारागृहाच्या बाहेर असलेल्या जामीनपत्र पेटीत टाकण्यासाठी दिल्याची माहिती त्याने दिली. याबाबत आसाब दस्तगीर शेख याची चौकशी केली असता, त्यानेच हे बनावट जामीनपत्र तयार केल्याची कबुली दिली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
उद्धव भोसले, असाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे असे यातील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हर्सूल कारागृहाचे तुरुंगाधिकारी इर्शाद याकूब सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बीड येथे दरोडा आणि मोक्काच्या गुन्ह्यात अटक असलेले उद्धव भोसले, आसाद दस्तगीर शेख आणि विशाल पारधे हर्सूल कारागृहातील न्यायाधीन बंदी आहेत. नेहमीप्रमाणे त्यांना शुक्रवारी बीड येथे न्यायालयासमोर तारखेसाठी हजर करण्यात येणार होते. त्यांना बाहेर काढत असताना विशाल पारधे याच्या जवळ कागदपत्र असलेले बंद पाकीट आढळले. अधिकाऱ्यांनी हे पाकीट उघडले असता पाकिटात काही कागदपत्रे आढळून आली. ही कागदपत्र बनावट जामीनपत्र असल्याचे समोर आले आहे.
तिसऱ्यांदा झाला प्रयत्न
कारागृह प्रशासनाने 25 जानेवारी रोजी कारागृहाच्या बाहेर असलेली जामीनपत्र पेटी उघडली असता, त्यांना या तिन्ही कैद्यांचे जामीनपत्राचे पाकीट आढळून आले होते. याबाबत बीड न्यायालयात चौकशी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले होते. दरम्यान याप्रकरणी हर्सूल कारागृह प्रशासनाच्या आदेशावरून उद्धव भोसले, आसाद शेख आणि विशाल पारधे यांच्याविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या कैद्यांनी बनावट कागदपत्र तयार केली कशी याबाबत पोलीस तपास करत आहेत.
बनावट शिक्क्याचा केला वापर
कैद्यांचे बनावट जामीनपत्र तयार करताना बनावट शिक्क्यांचा वापर केला गेला. जुन्या एका ऑर्डरवर वापरण्यात आलेले शिक्के कापून बनावट जामीनपत्रावर वापरण्यात आले. वापरण्यात आलेला शिक्का नांदेड न्यायालयाचा असून त्यात खाडाखोड करून तो बीड न्यायालयाचा असल्याचा भासवण्यात आल्याचा संशय असल्याची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी दिली. त्याचबरोबर कागद, बनावट न्यायालयीन ऑर्डर या कैद्यांपर्यंत आली कशी याबाबत तपास करत असल्याचं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.