औरंगाबाद - विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या शिक्षकाला पालकांच्या दबावानंतर निलंबित करण्यात आले. संस्थेच्या सचिवांनी निलंबना बाबतचे पत्र काढले आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. किरण परदेशी असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.
शहरातील सिडको भागातील एका खासगी शाळेत लैंगिक शिक्षण देण्याच्या नावाखाली शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवली होती. ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती. शाळेने अंतर्गत चौकशी लावून प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. यानंतर जवळपास एक महिन्याने हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी करून विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले.
हेही वाचा - प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रियकराला बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू
इन कॅमेरा जबाब घेतल्यावर किरण परदेशी या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सिडको पोलिसांनी बुधवारी दुपारी या शिक्षकाला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. शिक्षकावर कारवाई करण्यासाठी पालकांनी शाळेत गोंधळ घातला होता. पालकांच्या वाढत्या दबावानंतर शालेय प्रशासनाने किरण परदेशी यांना निलंबित केल्याचे पत्र काढले आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली.