औरंगाबाद - ऑक्सिजनच्याअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, अशा पद्धतीचे अपडेट आम्ही कोर्टात दिले हे खरे आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ऑक्सिजनची पूर्णपणे योग्य अंमलबजावणी सुरू होती आणि त्यामुळे कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नाही. राज्य सरकारने याबाबत काटेकोरपणे काम केले, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सतर्कतेचा इशारा -
दिल्लीमध्ये बर्ड फ्लूचा रुग्ण आढळला. त्यामुळे आम्ही राज्यातही सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि त्यानुसार आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोना बाबत मृत्यूचा आकडा वाढला हे खरे आहे. मात्र अनेक ठिकाणाहून मृत्यूंच्याबाबत आकडे बरोबर आले नव्हते. काही खाजगी हॉस्पिटलने डेटा पुरवला नव्हता. तो डेटा आल्यावर री काँसीलाशन करावे लागले आणि ही एक तांत्रिक बाब आहे, असे ते म्हणाले. तसेच मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचंही सांगितले.