औरंगाबाद - कन्नड नगर परिषदेच्या आवारात असलेल्या कोंडवाड्याची भिंत पाडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ५ जनावरे पळवली. यापैकी एका गाईला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. बेकायदेशीर गोमास विक्री करण्यासाठी ही जनावरे चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कोंडवाड्यात डांबण्यात येते. नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ११ मोकाट जनावरे होती. त्यापैकी ५ जनावारांना चोरट्यांनी पळवले. यावेळी एका गाईला आतिशय अमानुषपणे मारहाण केली गेली. या गाईवर नगरपरिषदेकडून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेने शहर पोलिसात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
जनावरांना कोंडवाड्यात चारापाण्याची व्यवस्था असल्यामुळे या जनावरांचे मालक महिना-महिना आपली जनावरे घेऊन जात नाहीत. शेवटी कमी दंड भरून ही जनावरे घेऊन जातात. यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचा चारा-पाण्याचा खर्च वाचतो. याशिवाय गोहत्या करणाऱ्या तथाकथित गुन्हेगारांनी जनावरे मोकाट सोडून दिली आहेत. गरज पडल्यास ही जनावरे पकडली जातात. तसेच त्यांची हत्या केली जाते. त्यामुळे कुणाला संशय सुद्धा येत नाही. अशी नवीन पद्धत गुन्हेगारांनी शोधली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शहरात ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला असताना देखील शहरात चोरीच्या अनेक घटना होत आहेत. यामुळे पोलीस प्रशासन घेत असलेल्या खबरदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.