औरंगाबाद - राज्यभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कमी पडत असल्याचे दिसून आले. मात्र, औरंगाबादेत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असून टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबादला लागतो रोज 65 किलो लिटर ऑक्सिजन
औरंगाबाद जिल्ह्यात रोज चौदाशेच्या जवळपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रोज लागणार ऑक्सिजन पुरवठा देखील वाढवावा लागला आहे. सध्या स्थितीत जिल्ह्याला 60 ते 65 किलो लिटर ऑक्सिजनची गरज भासते. त्यातील 15 किलो लिटर ऑक्सिजन स्थानिक पुरवठादार पुरवत आहेत. तर 50 किलो लिटर ऑक्सिजन चाकण येथून पुरवले जाते. रोज येणारा पुरवठा सुरळीत होत असल्याने रोज लागणारे पुरेसे ऑक्सिजन मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
घाटीत बसवले नवीन ऑक्सिजन टॅंक
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा जास्त लागतो. त्यात कोविडच्या गंभीर रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीत दोन ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात घाटीत 13 किलो लिटर इतकीच क्षमता होती. मात्र, दोन टॅंक बसवण्यात आल्याने साठवण क्षमता 53 किलो लिटर इतकी झाली आहे. म्हणजेच 25 हजार सिलिंडर इतका साठा घाटीत असणार असल्याने गरजू रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होईल, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - शहरात लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता