औरंगाबाद - राजमुद्रा स्पोर्ट क्लब पराजित नगर येथील मुलींच्या कबड्डी संघाने मंगळवारी दुपारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदाने खुली करून देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन या खेळाडूंना दिले आहे.
शहरात विविध खेळ खेळणारे तालुका पातळीपासून देशपातळीपर्यंतचे खेळाडू आहेत. या खेळाडूंना नियमित सराव असणे गरजेचे असते. मात्र कोरोनाच्याा पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून खेळाची मैदाने बंद आहे. यामुळे खेळाडूंना सराव करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धांसाठी तयारी कशी करायची असा प्रश्न या खेळाडूंना पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुलींच्या कबड्डी संघाने आयुक्तांची भेट घेऊन, मैदाने खुली करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ
यावेळी महापालिका आयुक्तांनी खेळाडूंशी संवाद साधला, खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मैदाने खुली करण्याबाबत निर्णय घेऊ असे अश्वासन यावेळी आयुक्तांनी खेळाडूंना दिले आहे.