औरंगाबाद - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक असलेल्या सचिन वाझे यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान मिठी नदीत अनेक पुरावे आढळले आहेत. त्यात कॉम्प्युटर, लॅपटॉपसह एका गाडीची नंबर प्लेटही तपास यंत्रणांना मिळाली आहे. ही नंबर प्लेट औरंगाबादमधील गाडीची असून ही गाडी नोव्हेंबर महिन्यात चोरीला गेली होती.
'ती' नंबर प्लेट औरंगाबादच्या इको गाडीची -
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी केली आहे. यावेळी सचिन वाझे यांनी दाखवलेल्या मिठी नदी जवळील जागेवर मिठी नदीत फेकून दिलेल्या काही वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयए कडून करण्यात आला. एनआयएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेने मिठी नदीत फेकून दिलेल्या वस्तूंमध्ये एक डीव्हीआर, काही नंबर प्लेट तर एक सीपीयू होता. या सर्व वस्तू एनआयएने जप्त केल्या आहेत. यात mh20 1539 या क्रमांकाची नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट औरंगाबाद पासिंगची असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अधिक तपास केला असता हा नंबर मारुती ईको कारचा असून ही गाडी हडको येथील रहिवासी विजय नाडे यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गाडी गेली होती चोरीला -
विजय नाडे जालना येथे समाज कल्याण विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची इको गाडी 16 नोव्हेंबर 2020 रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरीला गेली होती. याबाबत सिटीचौक पोलिसात गुन्हा दाखल असून कारचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी तसा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे चोरीच्या गाडीची नंबर प्लेट वाझेंच्या तपासात समोर कशी आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील काही ताज्या अपडेट्स -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटक व धमकीचे पत्र ठेवल्याची कबुली सचिन वाझे याने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिल्यानंतर यात खुलासे होत आहेत. 25 फेब्रुवारी रोजी अँटिलिया या इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. स्कॉर्पिओ मागे जी ईनोव्हा होती, त्यामध्ये सचिन वाझे होता. जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर गाडीमध्ये धमकीचे पत्र ठेवण्याचे सचिन वाझे विसरला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर परत मागे फिरून वाझेने धमकीचे पत्र स्कॉर्पिओ गाडीत ठेवले होते.