औरंगाबाद - साडेसात महिन्यात जन्मलेल्या दोन जुळ्या मुलींना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये सोडून १० दिवसापासून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या निमाई रुग्णालयामध्ये घडली आहे. या घटनेतील मातेचे नाव प्राची भांडरी आहे.
शहरातील प्राची भांडरी यांना 21 ऑक्टोबरला प्रसूती वेदना जाणवत होत्या, त्याच दिवशी त्यांनी गर्भ साडेसात महिन्याचा असताना खासगी रुग्णालयात दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र, दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने आणि त्या स्वत: दूध पिण्यास सक्षम होईपर्यंत डॉक्टरांनी त्यांना देखरेखीखाली आयसीयूत ठेवण्याचा सल्ला दिला. त्या नंतर प्राची आणि त्याच्या पतीने दोन्ही नवजात मुलींना टीव्ही सेंटर भागातील निमाई रुग्णालयात उपचारासाठी आयसीयू विभागात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी दोन्ही मुलींची परिस्थिती त्यांच्या आई-वडिलांना समजावून सांगितली व काही आठवडे सक्षम होईपर्यंत ठेवावे लागेल असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर दोन्ही मुलींना आयसीयूत दाखल करून मुलींचा पिता तिथून निघून गेला. मात्र, आई दोन दिवस फक्त रात्रीच्या वेळेस रुग्णालयात थांबायच्या. मात्र, त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून आई प्राची हिनेदेखील रुग्णालयात येणे बंद केले. त्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांना फोन करून वारंवार सूचना दिल्या. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता फोन बंद केला. वारंवार फोन बंद येत असल्याने निमाई रुग्णालय प्रशासनाने पोलिसात धाव घेतली पोलिसांनी देखील आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाहीत.
पोलिसांनी काही नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडूनही पोलिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या दोन्ही गोंडस मुलींचे संगोपन एका सामाजिक संस्थेकडे सोपविण्यात आला आहे. सध्या दोन्ही मुलींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे बिल कोण देणार हा नवीन पेच आता सुरू झाला आहे. पोलीस माता-पित्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.