सिल्लोड - खाद्य तेलाच्या किंतीचा भडका उडाल्याने सोयबीनची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोयाबीच्या तेलाची किंमत आता १७५ रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. या वाढत्या खाद्य तेलाच्या किंमती पाहून स्वयंपाकासाठी तेल वापरावे की नाही असा प्रश्न सामान्यांमधून आता विचारला जात आहे. हाताला काम नसल्याने सर्व-सामान्य वर्ग अगोदरच अडचणीत सापडलेला आहे.
पाम तेलावरील वाढलेले आयात भाव आणि शेंगदाण्याची होत असलेली निर्यात यामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. जवस, शेंगदाणा, सूर्यफूल, सोयबीन आदी खाद्यतेलांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सिल्लोड येथे गेल्यावर्षी ८० ते ९५ रुपये लिटर असलेले सोयबीन तेल या वर्षी १७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. सर्वसाधारण कुटुंबांमध्ये सर्वाधिक सोयबीन तेलाचा वापर केला जातो. मात्र, या वाढत्या भावाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सध्या तेलबियांचे नवीन पीक बाजारात येण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी आहे. यामुळे पुढील पाच महिने तरी ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोना व लॉकडाऊनमुळे सामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. आरोग्यावरील खर्चात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ, त्यातच खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका यामुळे खर्चाच्या बाबतीत सामान्य वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाद्य तेलाचे भाव कमी करण्यात यावे अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकारचे व्यापाऱ्यांसोबत साटेलोटे'