औरंगाबाद - अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना जाधववाडी भागात शुक्रवारी उघडकीस आली होती. मात्र, दिवसभर त्याची ओळख पटू शकली नव्हती. मात्र पोलिसांच्या चौकशीत शनिवारी सकाळी एकाने दिलेल्या माहितीच्या आधारे खूनातील मृताची ओळख पटली आहे. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. खेरवाडी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे. दारुच्या वादातून दादाराव यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सिमेंटच्या गट्टूने केला वार
जाधववाडी भाजीमंडईतील मुख्य संकुल समोरील शॉपींग सेंटरच्या गच्चीवर लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला दादाराव यांचा मृतदेह दिसून आला होता. त्यावेळी दादाराव यांची ओळख पटली नव्हती. दादाराव यांचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून करण्यात आला. माहिती मिळताच सिडको पोलिसांसह गुन्हे शाखा, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाने धाव घेतली होती. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सिमेंटचा तुटलेला गट्टू, खिचडीचे पाकीट, रुमाल, मास्क, खिशात दोन नशेच्या गोळ्या, चिल्लर पैसे आणि बाजूला गाठोड्यात एक ड्रेस, रुमाल आढळून आला होता.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर खून झालेल्या दादाराव यांची ओळख पटली. सोनवणे कुटुंबीय घाटीत दाखल झाले. दुपारनंतर दादाराव यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह अंत्यविधीसाठी सोनवणे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मारेकऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.