औरंगाबाद - वाढीव ऊसदराच्या मागणीसाठी शनीवारी पैठणमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ३१०० रुपये भाव द्या, एफआरपी प्रमाणे पैसे द्या या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पैठण शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासंबंधी व आंदोलनाविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १५ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वात पैठण - शेवगाव रस्त्यावरील पाटेगाव येथे 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलकांनी ऊसाची वाहतूक करणारी वाहने अडवून ठेवली.
हेही वाचा - 'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' मनीष सिसोडियांचा भाजपला टोला
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आम्ही ऊस वाहतूक करणारी वाहने काही काळ अडवून शेतकऱ्यांचा ऊस वाळू नये म्हणून त्या सोडून दिल्या आहेत. यापुढे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतेही वाहन सोडणार नाही. यामुळे, आंदोलन काळात शेतकऱ्यांनी ऊस तोडू व त्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन माऊली मुळे यांनी केली आहे