औरंगाबाद - पैठण तालुक्यातील चिंचाळा येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, चिंचाळा येथील तरुण योगेश परमेश्वर बोडखे हा एका खासगी वाहनावर काम करून आपली उपजीविका भागवत होता.
योगेशने रविवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रात्री १०च्या सुमारास मिरखेडा शिवारातील शेत गट नंबर ९९मध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी माहिती आहे. या घटनेची माहिती नातेवाईक दिलीप बोडखे यांना मिळताच त्यांनी तात्काळ चिंचाळा येथे पोलीस पाटील हरिभाऊ भीमराव बोडखे यांना सांगितली. त्यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याबद्दलची माहिती पाचोड पोलिसांना दिली.
योगेशला विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्याच्या परिवारात आई-वडील किंवा अन्य सदस्य नसल्याने कारण अस्पष्ट आहे. चिंचाळा येथील पोलीस पाटील हरिभाऊ भीमराव बोडखे यांच्या प्राथमिक माहितीवरून पाचोड पोलिसात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पाचोड पोलीस करत आहेत.
हेही वाचा - भारतासाठी दोन टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती