औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी शांततेत पार पडली. मतमोजणी केंद्रांवर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आज निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उफाळून आला. वैजापूरमध्ये एसटी महामंडळाची बस अज्ञाताने फोडल्याची घटना घडली आहे. यामुळे शांततेत पार पडत असलेल्या निवडणूक निकाल प्रक्रियेला गालबोट लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेकीमध्ये बसच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या बसवर संभाजीनगर असे नाव लिहिले असल्याने, बसवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नामकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
नामकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण
गेल्या अनेक दिवसापासून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत असून सुद्धा नामांतराच्या मुद्यावरून एकमेकांच्या विरोधात आहेत. तर विरोधीपक्ष असलेल्या भाजप कडूनही शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नामंतराच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी पेटण्याची शक्यता आहे.