औरंगाबाद - थकीत वीजबिल वसुली आणि वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर दगडफेक ( Stone Pelting on MSEB Employees ) झाल्याची घटना आंबेडकर नगर येथे घडली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ( Mukundwadi Police Thane ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
आंबेडकर नगर परिसरातील सहाय्यक अभियंता विजय गणेश काथर (वय 39) यांच्यासह शरद ढाकणे आणि श्याम मोरे हे कर्मचारी थकीत वीजबिल वसुली आणि वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी अशोक भातकुडे व रामेश्वर निकाळजे यांनी कर्मचाऱ्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. 'सर्वसामान्य नागरिक खायला मोहताज आहेत आणि तुम्ही वीजबिल तोडता. ताबडतोब तुम्ही निघून जा. अन्यथा तुम्हाला परिसरातून बाहेर जाऊ देणार नाही', अशी धमकी त्यांनी दिली. शिवाय काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडेही भिरकावली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळाने परिस्थितीचा अंदाज घेत कर्मचारी आंबेडकर नगर येथून बाहेर पडले. दरम्यान याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.