औरंगाबाद - शहरात लवकरच कोविडसाठीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये हे रुग्णालय पूर्णतः सज्ज होणार आहे.
औरंगाबादेत होणार 250 खाटांचे स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय चिकलठाणा परिसरात औद्योगिक वसाहतीच्या मेलट्रॉन येथे हे रुग्णालय उभारले जात आहे. या रुग्णालयात एकावेळी 250 रुग्णांवर उपचार होतील, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या नव्या रुग्णालयाची आतापर्यंत दोनदा पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी कुठल्याही त्रुटी बाकी न ठेवता लवकरात लवकर रुग्णालय सज्ज करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पंधराशेच्या घरात गेली आहे. रोज नव्याने रुग्ण वाढत असून रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, याकरिता जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज केली जात आहे. जिल्हा रुग्णालय, घाटी हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांत सध्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. महानगरपालिकेने कोविड सेंटर उभारले आहेत. त्याचबरोबर आता हे कोविड स्पेशल रुग्णालय सज्ज केले जात आहे. सध्या जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 1487 असून त्यापैकी 937 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत तर 69 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.