औरंगाबाद - "जय भीम" हा नारा उच्चारला तर भीम सैनिकांमध्ये वेगळाच उत्साह भरतो. मात्र, या नाऱ्याचा देखील इतिहास आहे. 1938 मध्ये औरंगाबादच्या मकरणपूर येथील सभेत पहिल्यांदा "जय भीम" उच्चारले गेले. बाबासाहेबांचे अनुयायी भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून उभारलेला नारा आज समाजाचे प्रेरणा देणारे घोषवाक्य ठरले आहे.
औरंगाबादेत दिलेला 'जय भीम'चा नारा आज सगळ्यांसाठी ठरतोय प्रेरणादायी "जय भीम" मुळे समाजाला मिळाला सन्मान नारास्वातंत्र्य पूर्व काळात मागासवर्गीयांना एकमेकांना हाक देताना किंवा कोणाला भेटल्यावर खाली वाकून नमस्कार किंवा मुजरा करावा लागायचा. त्यामुळे मागासवर्गीय समाजाला हीन वागणूक मिळायची. त्यामुळे समाजासाठी सन्मानाचा नारा असावा, अशी भावना मागासवर्गीय समाजाची होती. त्यावेळी बाबासाहेबांचे मराठवाड्यातील खंदे समर्थक भाऊसाहेब मोरे यांनी संकल्पना समोर आणली ती "जय भीमच्या" नाऱ्याची. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भाऊसाहेब यांनी याबाबत माहिती देत यापुढे कोणीही वाकून मुजरा करणार नाही, 'जय भीम' हाच नारा समाज देईल असे सांगितलं. त्याला बाबासाहेबांनी परवानगी दिली, आणि 30 डिसेंबर 1938च्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथील जाहीर सभेत भाऊसाहेब मोरे यांनी आपल्या निवेदनात "जय भीम"चा नारा दिला. आणि त्याला प्रतिउत्तर देत सुरू झाला जयघोष "जय भीम"चा.
मकरणपूर येथे झाली होती ऐतिहासिक जाहीर सभादेशात इंग्रज राजवट असली तरी मराठवाड्यात मात्र निजामांचे राज्य होते. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निज़ाम विरोधात आपली भूमिका मांडली होती. निजाम बाबासाहेबांना आपला विरोधक समजत होते. त्यामुळे मराठवाड्यात जाहीर सभा घेणे शक्य नव्हते. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका निजाम आणि इंग्रज राजवटीच्या सीमेवर असलेले गाव होते. मकरणपूर हे नाशिकच्या येवला जवळील गाव होते. जे इंग्रजांच्या राजवटीत होते. कन्नड आणि मकरणपूरमध्ये एक नदी होती. त्यामुळेच मकरणपूरयेथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यासभेला हजारो अनुयायांनी हजेरी लावली. याच सभेत भाऊसाहेब मोरे यांनी "जय भीम"चा नारा दिल्याने सभा ऐतिहासिक ठरली.
जय भीम"मुळे बाबासाहेबांचे मराठवाड्याशी जोडले गेले नातेकन्नड येथील जाहीर सभेत जय-भीम च्या जयघोषाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा याचे वेगळे नाते जोडले गेलं. भाऊसाहेब मोरे यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना एक सच्चा कार्यकर्ता मिळाला होता. मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी वेळोवेळी चळवळ उभारण्याचे काम बाबासाहेबांनी केले. मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची पाळंमुळं रोवायला सुरुवात केली. त्यांच्याच संकल्पनेतून उभा राहील हक्काचं मराठवाडा विद्यापीठ. याच विद्यापीठात तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाची जोडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा मोलाचा ठेवा आज त्यांच्या अनुयायांकडे आहे. भाऊसाहेब मोरे यांच्या कुटुंबीयांकडे बाबासाहेबांच्या अस्ती आजही जपून आहेत. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील हे मात्र नक्की.