कन्नड (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खतासाठी भर पावसात रांगेत उभे राहवे लागत आहे. यातून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ युरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच खताचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
कन्नड तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने कृषी सेवा केंद्रावर युरिया खतासाठी शेतकऱ्याची एकच झुंबड उडत आहे. शेतकरी तासनतास रांगेत उभे राहत आहे. या घटनेची माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ कन्नड शहरातील कृषी सेवा केंद्राला भेट दिली. यावेळी भर पावसात शेतकऱ्याची रांग होती. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून तालुक्यातील युरिया खताविषयी माहिती घेतली.
हेही वाचा - कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे
यावेळी तालुक्याला ऐंशी टक्के युरिया खत पुरवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. हर्षवर्धन जाधव यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील किती शेतकऱ्यांना, किती युरिया वाटप करण्यात आला याची तपशील यादी मागितली. मात्र, अशी कोणत्याही दुकानदाराकडे यादी उपलब्ध नसल्याने दोन दिवसात तपशील देतो, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
शेतीचा खरीप हंगाम संपत आला असून बांधावर तर सोडाच मात्र दुकानांमध्ये देखील युरिया मिळत नसून त्यासाठी शेतकऱ्यांना भर पावसात रांगेत उभे राहावे लागत आहे. एकीकडे जिल्हास्तरावरून तालुक्याला ऐंशी टक्के युरिया देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दूसरीकडे मात्र अजूनही शेतकऱ्याना युरिया मिळत नाही. मग युरियाचा साठा गेला कोठे? युरिया खताच्या एक गोणीसाठी जगाचा पोशिंदा पावसात भिजत असून तत्काळ शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून खताचा काळाबाजार करणाऱ्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.