वैजापूर (औरंगाबाद) - कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी 'इन्स्टाग्राम स्टार'ला बोलावणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. उद्घाटनावेळी गर्दी जमवल्या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने या दुकानदाराला 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.
औरंगाबादच्या वैजापूर शहरातील येवला रस्त्यावर असलेल्या एका कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन 1 एप्रिल रोजी पार पडले. या कार्यक्रमासाठी दुकानदाराने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर चर्चेत असलेल्या काही चेहऱ्यांना पाहुणे म्हणून बोलावले होते. मात्र, यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. याचे काही व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. सद्या जिल्ह्यात जमावबंदी असतानाही गर्दी केल्याने आणि कोरोनाचे नियम न पाळल्याने स्थानिक प्रशासनाने संबंधित दुकानदाराला 25 हजार दंड लावला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच कारवाई..!
उद्घाटनच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्या कलाकाराने आपल्या खात्यावरून कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला, ज्याला आतापर्यंत 24 हजार लोकांनी लाईक केले असून कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असेच काही व्हिडिओ वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.