औरंगाबाद - अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान असो किंवा आणखी कोणाचा मुलगा असो त्याला पैशांसाठी अडकवणे चुकीचे आहे. शाहरुख खान विरोधात आंदोलन केले. त्याच्या गाडीवर जळते टायर फेकले. मात्र, आज कोणाला फसवले जात आहे, याबाबत चुकीचे होत असेल तर बोलले पाहिजे, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. (Sanjay raut on Aryan Khan Case) ते एमजीएम विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संवादात बोलत होते. (Sanjay Raut at MGM University Aurangabad)
लवकरच बाळासाहेब ठाकरेंवर दुसरा चित्रपट -
मला फक्त चित्रपट पाहण्याचा छंद आहे. मी नेहमी चित्रपट पाहतो. त्यातूनच चित्रपट तयार करावा, असे वाटत होते. म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट तयार केला. आता लवकरच त्यांच्यावर दुसरा चित्रपट तयार होईल, त्याबाबत काम सुरू आहे. तर 26/11ला जो हल्ला झाला. त्यावर पोलिसांची प्रतिमा उंचावणारा चित्रपट तर माजी संरक्षणमंत्री दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यातील चित्रपट करणार आहे. त्याचेही काम सुरू आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.
आता रेडिमेड बातम्या मिळतात -
वृत्तपत्र सर्वांसाठी आहे. आमचे मुखपत्र असले तरी त्यात इतरांची बाजू मांडणे, हे आमचे कर्तव्य आहे. आता शोध पत्रकारिता राहिली नाही. आधी खूप फिरून बातमी मिळवावी लागत होती. आता सर्व आयती बातमी मिळते. सरळ म्हणतात 'ये लो उसकी बाजाओ', असे काम आज होत आहे. आजच्या पत्रकारितेत कोणतेही आव्हान राहिले नाही. तरी अशा बातमीबद्दल पुरस्कारही मिळवतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा - बाळासाहेब जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती - चंद्रकांत पाटील
संप हा शेवटचा पर्याय -
बाळासाहेबांना संपाचा राग यायचा. काम बंद न करता आंदोलन करण्याची त्यांची भूमिका असायची. गिरणी कामगारांचा संप त्यांना मान्य नव्हता. शेवटी काय झाले? गिरण्या बंद झाल्या. मालकांनी जागा विकल्या. मोठे नुकसान झाले. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघू शकतो. त्यासाठी काम बंद करण्याची गरज नाही. वेळेनुसार सर्व प्रश्न सुटतात, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. (Sanjay raut on ST Workers Strike)
'त्या' दिवसांमध्ये काय झालं हे कोणालाच माहीत नाही -
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागला. यानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी लागलेल्या त्या 32 ते 34 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं, त्यावर काही लेख, पुस्तके आली आहेत. कितीही पुस्तक येऊ द्या. मात्र, त्यावेळी काय झाले ते आमच्या दोघा-तिघांना माहित आहे. त्यावर खरे पुस्तक यायचे आहे, अशी मिश्किल टीका खासदार राऊत यांनी केली.